रवा मका टिक्की हे एक इंडियन स्टार्टर आहे. हे स्टार्टर खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जाते. त्यातलीच एक पद्धत आपण आज बघणार आहोत. ही टिक्की खायला खूप टेस्टी लागते. तसेच लहान मुलांनाही खूप आवडते.
साहित्य :-
- एक मोठी वाटी ताजे मक्याचे दाणे( स्वच्छ धुऊन बॉईल केलेले)
- एक वाटी ब्रेड क्रम्स
- एक वाटी बारीक रवा (सुजी)
- मीठ चवीनुसार
- एक चमचा तिखट
- अर्धा चमचा धणा पावडर
- अर्धा चमचा जिरे
- तेल
- एक छोटा चमचा चाट मसाला
- दोन कमी तिखट हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या
- अर्धा लहान चमचा अद्रक ची पेस्ट
- अर्धा चमचा लिंबू चा रस
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला
- एक मध्यम आकाराची शिमला मिरची बारीक चिरलेली
कृती :-
- मध्यम आचेवर एका कढाई मध्ये दोन चमचे तेल घालून घ्यावे. तेल थोडे गरम झाले की त्यामध्ये जिरे घालावे.जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये अद्रक ची पेस्ट घालावी. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालावी. चिरलेला कांदा घालावा. कांदा थोडा गुलाबी झाला की त्यामध्ये बारीक चिरलेली सिमला मिरची घालावी. हे सर्व मिश्रण व्यवस्थित हलवून घ्यावे व झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे शिजू द्यावे.
- नंतर त्यामध्ये आधीच बॉईल करून ठेवलेले मक्याचे दाणे घालावे. नंतर त्यामध्ये धने पावडर ,चवीनुसार मीठ, चाट मसाला ,लिंबाचा रस ,लाल तिखट, (तिखट तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे कमी-जास्त करू शकता) सर्व मसाले घालून व्यवस्थित परतून घ्यावे.
- मक्याच्या दाण्यांमध्ये पाणी राहिले नाही पाहिजे असे परतून घ्यावे हे सर्व मिश्रण परतले की त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
- मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यावे.व व्यवस्थित बारीक वाटून (ब्लेंड करून) घ्यावे.
- नंतर ते मिश्रण एका खोल भांड्यात काढून घ्यावे. (मिश्रण थोडे पातळ असेल )तर त्याच्या घट्टपणा साठी त्यामध्ये ब्रेडक्रम्स घालावेत. (ब्रेड क्रम्स चे प्रमाण तुम्ही कमी-जास्त करू शकता)
- एकदा का मिश्रण व्यवस्थित घट्ट झाले की त्याचे गोल छोटे गोळे करून बोटांनी हलकेसे प्रेस करून त्यांना टिक्की चा आकार द्यावा.( टिक्की चा आकार तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे लहान- मोठी करू शकता).
- एकीकडे गॅसवर मध्यम आचेवर तळण्यासाठी तेल गरम करावे. सर्व गोल गोळ्यांना टिक्की चा आकार देऊन झाल्यानंतर तेल व्यवस्थित तापले आहे की नाही ते पहावे.
- आपण बारीक रवा टिक्की ना कोटिंग करण्यासाठी घेतला आहे त्यात अगदी किंचितसे मीठ घालावे.( मीठ अगदी थोडेच घालावे.कारण आपण टिक्की च्या मिश्रणात ऑलरेडी मीठ घातलेले आहे.)
- तेल तापल्यानंतर त्या टिक्की ना बारीक रव्यामध्ये व्यवस्थित घोळवून( रवा टिक्की च्या सर्व बाजुंना लागला पाहिजे) तेलात तळण्यासाठी सोडाव्यात.मध्यम आचेवर या टिक्की तेलात तळाव्यात.
- टिक्की ची खालची बाजू व्यवस्थित तळून झाल्यास टिक्की दुसऱ्या बाजूने तेलात पलटावी लालसर होईपर्यंत तळून घ्यावी.
- दोन ते तीन मिनिटंच टिक्की तळण्यासाठी वेळ लागेल. कारण आत मधले टिक्की चे मिश्रण आपण आधीच शिजवून घेतले आहे. त्यामुळे फार वेळ टिक्की तेलात ठेवू नये. हलकीशी लालसर झाली की बाहेर काढावी.
- एका प्लेटमध्ये टिशू पेपर ठेवून तळून झाली की त्यावर ठेवावी .असे केल्याने टिक्की मधील एक्स्ट्रा ऑइल टिशू पेपर सोक करून घेईल.
अशा पद्धतीने तुमची रवा (सुजी )मका टिक्की खाण्यासाठी तयार........ तुम्ही ही टिक्की पुदिना चटणी सोबत किंवा टोमॅटो केचप सोबत खाऊ शकता.
टिप्स :-
- मका बॉईल झाल्यानंतर त्यामध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्यायची.
- रव्याचे कोटिंग करण्याअगोदर रवा एका ताटलीत घेऊन त्यामध्ये किंचितसे मीठ घालून मिक्स करून घेणे थोडेसेच मिठ घालावे जास्त घालू नये कारण आपण टिक्की च्या मिश्रणात आधीच मीठ घातले आहे.
By Amruta's Kitchen

Comments
Post a Comment