मुगाचे धिरडे ( पुडला )



मुगाचे धिरडे  ( पुडला )
           मुगाचे धिरडे हे महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये बनवले जाते तसेच हे धिरडे खूप पौष्टिकही असते हे धिरडे अधिक पौष्टिक करण्यासाठी तुम्ही यामध्ये मिक्स डाळीचे पीठ (उदाहरणार्थ तांदूळ पीठ, नागली पीठ, बेसन पीठ)  वापरू शकतात .त्यामुळे धिरडे अधिक पौष्टिक होते.

साहित्य :-

  1. एक मोठी वाटी मुगाचे पीठ 
  2. अर्धी छोटी वाटी बारीक रवा
  3. लसूण पाच ते सहा पाकळ्या 
  4. लहान अर्धा चमचा जिरे
  5. चिमुटभर हिंग 
  6. मीठ चवीपुरते 
  7. बारीक चिरलेली कोथिंबीर 
  8. अर्धा लहान चमचा हळद 
  9. एक चमचा लाल तिखट 
  10. लहान अर्धा चमचा धने पावडर
  11. तेल 
  12. पाणी (आवश्यकतेनुसार)
कृती :-

  1. पहिले खलबत्त्यात पाच ते सहा लसूण पाकळ्या, अर्धा लहान चमचे जिरे हे व्यवस्थित कुटून घ्यावे. (असे केल्याने धिरडे चवीला छान लागतात.)
  2. नंतर एका भांड्यात मुगाचे पीठ, बारीक रवा (रव्या ने धिरडे यांना कुरकुरीतपणा येतो) व्यवस्थित मिक्स करून घ्यावा.
  3. नंतर त्यामध्ये लसूण जिरे( पेस्ट कुटलेली) मिक्स करावी. नंतर त्यामध्ये एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धने पावडर ,चिमुटभर हिंग, चवीनुसार मीठ हे सर्व घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
  4. नंतर त्यामध्ये पीठ थोडे पातळ होईल इतपत पाणी टाकावे .(फार पातळ नाही करायची आपल्याला डोशाच्या पिठापेक्षा थोडे पातळ करायचे)
  5. त्यामुळे पाणी मिक्स करताना हळूहळू करावे.(एकदम पाणी घालू  नये )हे सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. 
  6. नॉन स्टिक पॅन घ्यावा.तो मध्यम आचेवर गरम करायला ठेवावा.  पँन व्यवस्थित गरम झाला. त्यावर मिश्रण व्यवस्थित ढवळून पळीच्या साह्याने डोसे टाकतो तसे त्याप्रमाणे धिरडे पसरवून घ्यावे. व नंतर आजू बाजूने तेल सोडावे.
  7. पहिले टाकलेली धिरड्याची बाजू व्यवस्थित शिजल्यानंतर धिरडे दुसऱ्या साईडने पलटुन घ्यावे.व दुसरीही बाजू व्यवस्थित शिजवून द्यावी.
  8. दोन्ही बाजू व्यवस्थित झाल्यानंतर  पँनवरून वरून धिरडे प्लेटमध्ये घेऊन टोमॅटो केचप किंवा हिरव्या चटणीसोबत धिरडयांचा आस्वाद घ्यावा.

टिप्स :-

  1. मुगाचे धिरडे जसे केले त्याप्रमाणे तुम्ही बेसन पिठाचे ही धिरडे करू शकता फक्त मुगाच्या पिठाच्या ऐवजी त्यात तुम्हाला बेसन पीठ घालावे लागेल.( बाकी कृती आहे तशीच करायची) तसेच सर्व पिठे समप्रमाणात घेऊन  हे धिरडे तुम्ही बनवू शकता.
  2. धिरड्यांमध्ये तुम्ही आवडत असेल तर बारीक शिमला मिरची चिरून घालू शकता.बारीक कांदा ही चिरून घालू शकता. बारीक टोमॅटोही चिरून घालू शकता. असे केल्यास हे धिरडे अधिक पौष्टिक होऊ शकते.
  3. धिरड्यांमध्ये लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट ही घालू शकता.
  4. लहान मुलांनी हे धिरडे आवडीने खावे ,याकरिता धिरडे तयार झाले की त्यावर चीज किसून व थोडासा टोमॅटो केचप घालून मुलांना  धिरडे रोल करून दिल्यास लहान मुले आवडीने खातील.

By Amruta's Kitchen

Comments