गव्हाची पुरी
साहित्य:-
- दोन वाट्या कणिक
- अर्धा लहान चमचा पिठीसाखर
- तीन चमचे बारीक रवा
- पाऊण चमचा मीठ
- एक छोटा चमचा ओवा
- तळण्याकरता तेल
- गव्हाचे पीठ मळण्याकरता पाणी
- दोन छोटे चमचे तेल
कृती:-
1.दोन वाट्या कणकेत तीन चमचे बारीक रवा ,मीठ, पिठीसाखर ,एक चमचा तेल, ओवा घालून घट्ट भिजवावी. व एक तास झाकून ठेवावी. (भिजवलेली कणिक झाकून ठेवल्यास ती चांगली मुरते व पुऱ्या छान होतात)
2. एक तासानंतर कणकेमध्ये तेल घालून परत एकदा चांगली मळून घ्यावी. त्याचे एकसारखे छोटे गोळे करावेत. प्रत्येक गोळ्याचा हाताने पेढा करून पोळपाटावर गोल पुरी लाटावी.
3.पसरट कढईत तळण्याकरता तेल मध्यम आचेवर गरम करून लाटलेल्या दोन तीन पुऱ्या एका वेळेस तेलात सोडाव्यात. झारा घेऊन पुरीवर तेल टाकावे. पुरी फुगली की उलटावी. अशा सर्व पुर्या सोनेरी रंगावर तळून घ्याव्यात.
टिप्स:-
1. पुरी लाटताना फार जाड अथवा फार पातळ नसावी, मध्यम असावी.
2.पुर्यांची कणिक सैल असू नये, सैल कणकेच्या पुऱ्या चिवट होतात व फुगत नाहीत.
3. पुरीच्या कणकेत अर्धी वाटी रवा घातल्याने पुऱ्या लवकर मऊ पडत नाही.
4. पुरी पोळपाटावर लाटताना तेलाचा वापर करावा, पिठाचा वापर करू नये.
5. घरगुती पार्टी करता जास्त पुऱ्या करायचा असल्यास मोठा प्लास्टिकचा कागद पसरवून त्याला तेलाचा हात लावून पुऱ्या लाटून त्यावर ओळीने लावून ठेवाव्यात. व दुसऱ्या प्लास्टिकच्या पेपर ने त्या पूर्णपणे झाकून ठेवाव्यात. जेवायच्या वेळेस एकदम तळाव्यात.वीस पंचवीस पुऱ्या पेक्षा जास्त करू नयेत.नाहीतर पुऱ्या कोरड्या पडून फुगणार नाहीत.
By Amruta's Kitchen

Comments
Post a Comment