सुरळीची वडी ( खांडवी)



सुरळीच्या वड्या ( खांडवी)

          सुरळीची वडी ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात याला सुरळीची वडी म्हणतात.तर गुजरात मध्ये खांडवी या नावाने ती ओळखली जाते. अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे बनवण्याची पद्धत मात्र महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये सारखीच आहे.

साहित्य :-
1. एक वाटी बेसन 
2. एक वाटी दही 
3. दोन वाटी पाणी 
4. पाउण ते एक चमचा मिरचीचा ठेचा
5.  एक लहान चमचा हळद
6.  अर्धा लहान चमचा हिंग 
7. अर्धा चमचा अद्रक ची पेस्ट
8. मीठ चवीनुसार 

फोडणीसाठी साहित्य :-
1. एक चमचा मोहरी 
2. एक चमचा जिरे 
3. पाच ते सहा कडीपत्त्याची पानं
4.  चिमुटभर हिंग
5.  चिमुटभर मीठ 
6. दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या 
7. बारीक चिरलेली कोथिंबीर 
8. सुके खोबरे किसलेले 
9. उलथने ( मिश्रण पसरवण्यासाठी ) 
10. थोडेसे तेल लावून घेतलेली स्टीलची ताट 
11. दोन टेबलस्पून तेल

कृती :-
1. बेसन दही पाणी एकत्र करावे.बेसनाच्या गुठळ्या न होऊ देता मिश्रण भिजवावे. (शक्यतो मिश्रण रवीने मिक्स करावे जेणेकरून त्यात गुठळी होणार नाही)
2. नंतर त्यात मिरचीचा ठेचा,अद्रक ची पेस्ट, हळद, हिंग व चवीपुरते मीठ घालावे. व सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यावे.
3. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये हे सर्व मिश्रण घालून  घ्यावे. मध्यम आचेवर हे सर्व मिश्रण शिजेपर्यंत एकसारखे ढवळत राहावे. मिश्रण ढवळताना त्यात गुठळी होऊ देऊ नये.याची काळजी घ्यावी. त्यासाठी मिश्रण एकसारखे ढवळत राहणे आवश्यक आहे.
4. मिश्रण दाटसर झाले कि गॅस बंद करावा.व लगेचच ताटा ला  किंचित तेल लावून घ्यावे.( जास्त तेल लावू नये त्यामुळे 
मिश्रण  व्यवस्थित पसरणार नाही)( यामध्ये तुम्ही ताटा ऐवजी तुमचा किचन ओटा ही स्वच्छ करून वापरू शकता)
5. मिश्रण थंड व्हायच्या आत (मिश्रण थंड होऊ देऊ नये) ते लगेचच उलथन्याच्या साह्याने मिश्रणाचा पातळ थर ताटाच्या वरच्या बाजूस ठेवून उलथन्याच्या साह्याने  ताटावर वरच्या बाजूस पसरून घ्यावे.
6. ते मिश्रण पाच ते दहा मिनिटं थंड होण्यास बाजूला ठेवावे .
7. कढईत दोन ते तीन चमचे तेल गरम करण्यास ठेवावे.।तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे, मोहरी ,हिंग, चिमुटभर मीठ ,दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, कढीपत्ता घालून फोडणी करावी.
8. फोडणी व्यवस्थित झाली की चमच्याच्या साह्याने  पसरून घ्यावी नंतर त्यावर किसलेले सुके खोबरे पसरवून घ्यावे. व बारीक चिरलेली कोथिंबीर ही पसरवून घ्यावी.
9. नंतर सुरीने दोन ते अडीच इंची उभ्या पट्ट्या कापाव्यात व मधोमध एक आडवा काप देऊन पट्ट्या गुंडाळून घ्याव्यात.(गुंडाळताना त्या मधुन तुटणार नाहीत याची दक्षता घ्यावी.त्यामुळे हलक्या हाताने गुंडाळी करावी)
10. गुंडाळी करून झाल्यानंतर त्यावर तुम्ही थोडे सुके किसलेले खोबरे व बारीक चिरलेली कोथिंबीर व हवी असल्यास जिरे मोहरीची फोडणी देऊन सुरळीच्या वड्यांचा आस्वाद घेऊ शकता.

टीप :-
 1. मिश्रणाचा पातळ थर पसरवण्यासाठी तुम्ही ताटांचा वापर केला तर ताट जास्त लागू शकतात.त्याऐवजी तुम्ही तुमचा किचन ओटा स्वच्छ करून वापरल्यास त्यावर ते मिश्रण पसरवले तर ते अधिक उत्तम राहील.
 2. सुरळीच्या वड्यांवर जिरे, मोहरी,कढीपत्ता, किसलेले सुके खोबरे, बारीक चिरलेली कोथिंबीर यांची फोडणी घातल्यास त्या वड्या खायला अधिक टेस्टी लागतात. म्हणून जर जिरे मोहरीची फोडणी आवडत असेल तर नक्की घालावी.

By Amruta's Kitchen

Comments