मँगो ड्रायफ्रूट केक


मँगो ड्रायफ्रूट केक...
साहित्य :-
  1. एक वाटी बारीक रवा.
  2. अर्धी वाटी साजूक तूप.
  3. पाव वाटी मैदा.
  4. अर्धी वाटी पिठीसाखर( आवश्यकतेनुसार)
  5. चिमुटभर मीठ.
  6. एक चमचा इलायची पूड.
  7. सव्वा वाटी आंब्याचा रस( शक्यतो हापूस आंब्याचा रस  घ्यावा. टेस्ट खूप छान येते.)
  8. अर्धा चमचा बेकिंग पावडर.
  9. पाव चमचा बेकिंग सोडा.
  10.  पिस्ता आणि बदाम यांचे बारीक केलेले काप ( सजावटीसाठी) पिस्ते घेताना खारे पिस्ते घेऊ नयेत नॉर्मल टेस्ट असलेले पिस्ते घ्यावेत. 
  11. चेरी (सजावटीसाठी)

कृती :-
  1. एका पातेल्यात एक वाटी बारीक रवा, अर्धी वाटी साजूक तूप,पाव वाटी मैदा,अर्धी वाटी पिठीसाखर, (पिठीसाखर तुम्ही कमी-जास्त करू शकता, आंब्याचा रस किती गोड आहे, त्याप्रमाणे पिठी साखरेचे प्रमाण ठरवावे.) चिमूटभर मीठ, एक चमचा इलायची पूड, सव्वा वाटी आंब्याचा रस हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणे. (एकत्र करताना त्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.) स्मूथ बॅटर तयार झाले पाहिजे.
  2. सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्रित करून दहा ते पंधरा मिनिटं झाकून ठेवावे. असे केल्यास रवा फुलण्यास मदत होते.
  3. दहा ते पंधरा मिनिटानंतर रवा व्यवस्थित फुललेला असेल. व केकचे बॅटर किंचितसे घट्ट झालेले असेल. त्यामध्ये अगदी थोडेसे पाणी घालून व बदामाचे  बारीक केलेले काप त्यामध्ये घालून  बॅटर व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. खूप पाणी घालू नये. बॅटरची कन्सिस्टन्सी इडलीच्या पिठासारखी असावी. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळ नाही.
  4. नंतर त्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर व पाव चमचा बेकिंग सोडा घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. केकच्या वरच्या भागावर पिस्त्याचे बारीक केलेले काप व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यावे.
  5. केक पात्राला थोडेसे तुपाने ग्रीस करून, केक चिटकू नये म्हणून त्यावर थोडासा मैदा पसरवून केक पात्र चांगले कव्हर करून घ्यावे. किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता.
  6. जर तुम्ही हा केक ओव्हनमध्ये करत असाल तर ओवन 150℃ ला प्रि-हीट करून घ्यावा व  45 ते 50 मिनिटं सेट करून केक ओव्हन मध्ये बेक करायला ठेवावा.
  7. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर, जाड बुडाच्या कढईमध्ये तळाशी मीठ टाकून त्यावर एक रिंग ठेवून कढाई 10 मिनिटे प्रि-हीट करून घ्यावी. कढई व्यवस्थित प्रि-हीट झाल्यानंतर, रिंग वर केक पात्र ठेवून  वरतून एखादी मोठी परात झाकून  केक मध्यम आचेवर 40 ते 45 मिनिटे बेक करून घ्यावा. 
  8. केक व्यवस्थित बेक झाला आहे की नाही, हे टूथपीक च्या साह्याने टेस्ट करावे. टूथपीक केकच्या आरपार टाकून, केकचे बॅटर जर टूथपीकला चिटकत नसेल,तर तुमचा केक हा व्यवस्थित बेक झालेला आहे.

टिप्स :-
  1. मँगो केक बनवताना शक्यतो हापूस आंब्याचा रस घ्यावा त्यांने केकला खूप छान चव पण येते आणि रंगही छान येतो.
  2. मँगो केक बनवताना ज्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्हाला आवडत असतील ते तुम्ही घातले तरी चालतील मी इथे फक्त बदाम आणि पिस्ते हेच ड्रायफ्रूट घातले आहे. फक्त पिस्ते घेताना तुम्हाला ते खारट न घेता नॉर्मल पिस्ते वापरायचे आहे.
  3. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल आणि हा केक तुम्ही कढईमध्ये बनवत असाल तर कढाई पूर्णपणे प्रि-हीट झाल्यानंतरच, केक बॅटरमध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालायचा आधी घालून ठेवायचा नाही. आणि नंतर पुढची प्रोसेस करायची.
  4. केकच्या बॅटर ची कन्सिस्टन्सी इडली च्या पीठासारखे असावी.जास्त पातळ नाही.आणि घट्टही नाही. पाण्याचा वापर कमीत कमी करावा.
  5. केक रेडी झाल्यानंतर तो लगेचच केक पात्राच्या बाहेर काढण्याची घाई करायची नाही. असे केल्यास केक तुटू शकतो. तो पूर्णपणे आधी थंड होऊ द्यावा आणि नंतर केक पात्रापासून वेगळा करावा.
By Amruta's Kitchen

Comments

Post a Comment